_*🌸महाभारतातील बोधपर श्लोक🌸*_
*सौतिरुवाच-*
*आद्यं पुरुषमीशानं पुरुहूतं पुरुष्टुतम्।*
*ऋतमेकाक्षरं ब्रह्म व्यक्ताव्यक्तं सनातनम्॥*
*असच्च सच्चैव च यद्विश्वं सदसतः परम्।*
*परावराणां स्रष्टारं पुराणं परमव्ययम्॥*
*- १.१.२२-२३ (१.१.२८-२९), महाभारत*
अर्थ :-
जो आदिपुरूष परमेश्वर सर्वांचे आदिकारण व सर्वांच्या अंतर्यामी असणारा या विश्वाचा नियंता आहे. यज्ञांमधून ज्याला अावाहन केले जाते व ज्याच्यासाठी यज्ञ केला जातो, तसेच अनेक पुरुषांनी अनेक नामांद्वारे ज्याची स्तुती केली आहे. जो ऋत म्हणजेच सत्यस्वरूप आहे. जो एकाक्षर म्हणजेच एकमेव क्षर न होणारा नाश न पावणारा तसेच सर्वव्यापी प्रणवरूप ॐकार आहे. जो साकार व निराकार स्वरूपातले सनातन असे अविनाशी परब्रम्ह आहे.
असत् व सत् (म्हणजेच माया व ब्रह्म) या दोन्ही रुपाने जो या विश्वात विद्यमान आहे आणि तरीही ज्याचे स्वरूप सत् व असत् यांच्याहूनही भिन्न व विलक्षण असे आहे. जो संपुर्ण परावर म्हणजेच स्थूळ व सूक्ष्म विश्वाचा स्रष्टा (निर्मिक, सृजनकर्ता), पुराणपुरुष व अव्यय म्हणजेच क्षय व वृद्धी सारख्या भौतुक विकारांपासून अलिप्त आहे.
(अशा संपूर्ण चराचराच्या मालकाला मी वंदन करतो.)
टीप-
महर्षी वेदव्यासांना वंदन करून उग्रश्रवा सौती ऋषी नैमिषारण्यात ह्या श्लोकापासून महाभारत कथेची सुरूवात करतात,
_नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम्।_
_देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्॥१.१.१॥_
लोमहर्षण ऋषींचा पुत्र उग्रश्रवा सौती ऋषींनी नैमिषारण्यात शौनकऋषी व त्यांच्या गुरुकुलातील इतर ऋषींना ऋषीश्रेष्ठ व्यासांनी लिहिलेला जय नावाचा इतिहास (महाभारत) सांगितला. महाभारताच्या आदिपर्वातील पहिल्या अध्यायात याचं वर्णन आहे.
त्याप्रसंगी उग्रश्रवा सौती ऋषी सर्वप्रथम या विश्वाच्या निर्मात्यास, नियंत्यास वरील श्लोकातून प्रार्थना करतात व पुढे सर्व ऋषींच्या आग्रहास्तव महाभारत कथा सांगतात.
आपण आजपासून रोज एक याप्रमाणे महाभारतातील काही 'बोधपर व नीतीपर श्लोक' ह्या विषयावरील मागे सुरू केलेला पण मध्येच खंड पडलेला उपक्रम पुन्हा पहिल्यापासून सुरू करत आहे. श्लोकार्थ व श्लोकसंदर्भित घटना यांचाही यावेळी यथायोग्य, यथाशक्य उल्लेख होईल.
संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या आध्यायातच महाभारतकथेची स्तुती केली आहे व माउली सांगतात की जे महाभारतात नाही ते तिन्ही लोकांमध्ये कुठेच नाही.
_म्हणऊनि महाभारतीं जे नाही। ते नोहेचि लोकी तिहीं।_
_येणे कारणे म्हणिपे पाहीं। व्यासोच्छिष्ट जगत्रय॥१.४७॥_
महाभारता विषयी माउलींचे काय म्हणणे आहे आणि माउलींनी महाभारताला कोणत्या कोणत्या विशेषणांनी गौरवलेलं आहे हे ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील खालील ओव्यांवरून आपल्या लक्षात येते,
_आता अवधारा कथा गहन। जे सकळां कौतुका जन्मस्थान।_
_की अभिनव उद्यान। विवेकतरूचे॥१.२८॥_
_ना तरी सर्व सुखांची आदि। जे प्रमेयमहानिधी।_
_नाना नवरससुधाब्धि। परिपूर्ण हे॥१.२९॥_
_म्हणोनी हा काव्यां रावो। ग्रंथ गुरुवतीचा ठावो।_
_एथुनि रसां आला आवो। रसाळपणाचा॥१.३३॥_
_एथ चातुर्य शहाणे झाले। प्रमेय रुचीस आले।_
_आणि सौभाग्य पोखले। सुखाचे एथ॥१.३५॥_
_आणि पाहता नावेक । रंगी सुरंगतेची आगळीक।_
_गुणां सगुणतेचे बिक। बहुवस एथ॥१.३८॥_
_भानुचेनि तेजें धवळले। जैसे त्रैलोक्य दिसे उजळले।_
_तैसे व्यासमती कवळले । अवघे विश्व॥१.३९॥_
आणि अशा महाभारतरुपी कमळाचा पराग म्हणजेच सार, तो युद्धप्रसंगी श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला केलेला बोध म्हणजेच भगवद्गीता होय. असे माऊली पुढे सांगतात.
_आता भारतीं कमळपरागु। गीताख्यु प्रसंगु।_
_जो संवादिला श्रीरंगु। अर्जुनेसी॥ १.५०॥_
_ना तरी शब्दब्रह्माब्धि। मथिलेया व्यासबुद्धि।_
_निवडिले निरवधि। नवनीत हे॥१.५१॥_
संकलन व टीप : अभिजीत काळे, ९८५०६९०५९७.
*🌸🌺🌸शुभ सकाळ🌸🌺🌸*
No comments:
Post a Comment