Wednesday, May 19, 2021

महाभारतातील निवडक श्लोक*पाण्डुला शाप

 *🙏🏼🙏🏼🕉️जय सद्गुरू🕉️🙏🏼🙏🏼*

    *महाभारतातील निवडक श्लोक*


*नाहं घ्न्तं मृगन्राजन्विगर्हे चात्मकारणात्।*

*मैथुनं तु प्रतीक्ष्यं मे त्वयेहाद्यानृशंस्यतः॥*

*सर्वभूतहिते काले सर्वभूतेप्सिते तथा।*

*को हि विद्वान्मृगं हन्याच्चरन्तं मैथुनं वने॥*

*अस्यां मृग्यां च राजेन्द्र हर्षान्मैथुनमाचरम्।*

*पुरुषार्थफलं कर्तुं तत्त्वया विफलीकृतम्॥*

*पौरवाणां महाराज तेषामक्लिष्टकर्मणाम्।*

*वंशे जातस्य कौरव्य नानुरूपमिदं तव॥*

*नृशंसं कर्म सुमहत्सर्वलोकविगर्हितम्।*

*अस्वर्ग्यमयशस्यं चाप्यधर्मिष्ठं च भारत॥*

*स्त्रीभोगानां विशेषज्ञः शास्त्रधर्मार्थतत्त्ववित्।*

*नार्हस्त्वं सुरसङ्काश कर्तुमस्वर्ग्यमीदृशम्॥*

*त्वया नृशंसकर्तारः पापाचाराश्च मानवाः।*

*निग्राह्याः पार्थिवश्रेष्ठ त्रिवर्गपरिवर्जिताः॥*

              *- १.१२३.२५-३१, महाभारत.*


अर्थ :-


     हे राजा! मी स्वतः मारला गेल्या कारणाने तुझी निन्‍दा करत नाही. की तू मृगांची व इतर प्राण्यांची शिकार करतोस त्यांना मारतोस यासाठीही तुझी निन्‍दा करत नाही. मला तर इतकेच सांगायचे आहे की तू हे नृशंसकृत्य करायला नको होतेस, तू दयाभावनेने च्या सहाय्याने माझी मैथुन क्रियेतून निवृत होईपर्यंत  वाट पाहून नंतर मला मारायला हवे होतेस. 

    जे समस्त प्राणीमात्रांसाठी (प्राणीमात्रांच्या वंशवृद्धीसाठी, प्रजोत्पादनासाठी) हितकारक आणि इष्ट आहे अशा मैथुन क्रियेत रत असलेल्या कोण्या प्राण्याचा कोणता विवेकशील पुरुष वध करेल?

      हे राजेन्‍द्रा! मी हर्षोल्‍ल्हासाने अापल्या कामरुपी पुरुषार्थाला सफल करण्यासाठी या हरिणीबरोबर संयोगरत होतो; परंतु तू त्यास निष्‍फल केलेस.

     महाराज! क्‍लेशरहित कर्म करणार्‍या कुरुवंशामध्ये जन्‍माला येऊनही तू जे हे क्लेशपूर्ण कर्म केले आहेस, ते तुझ्या व तुझ्या कुळाच्या कीर्तीला अनुरूप नहीये.  

     भारता! तुझे हे नृशंस (निष्ठूर, अधम, नीच, अतिशय कठोरतापूर्ण) असे कृत्य सर्वलोकांमध्ये निन्द्य असेच आहे. ते स्‍वर्ग आणि यश, कीर्ती यांच्या लाभापासून वंचीत ठेवणारे आहे. याबरोबरच हे एक महान पापकर्म आहे.  

   हे देवतातुल्‍य राजा! तू स्त्रीभोग जाणतोस त्याचबरोबर धर्मशास्त्र आणि अर्थ यांच्या तत्त्वांचाही ज्ञाता आहेस. तू असे अस्वर्ग्यकारक (नरकप्रद) पापकर्म करायला नको होतेस.

      हे नृपश्रेष्ठा! तुझे कर्तव्य तर हे आहे की धर्म, अर्थ आणि काम या त्रिवर्गासंदर्भात जे निष्ठूरतापूर्वक पापकर्म करणारे आहेत त्यांना दंड देणे.  


टीप-

महाभारताच्या आदिपर्वातील संभवपर्वात राजा पांडुच्या कथेत मृगरूपातील मरणासन्न अवस्थेमधील कंदम ऋषी राजा पांडुला वरील बोल सुनावतात. ज्याप्रमाणे सुखरत असताना तू मला मारलेस त्याचप्रमाणे स्वस्त्रीबरोबर संयोगसुखात असतानाच तुला मृत्यू येईल असा शाप देतात. 

    राजा पाण्डू त्याला मिळालेल्या या शापाविषयीचा वृत्तांत कुंती व माद्री या आपल्या दोन्ही राण्यांना सांगतो तेव्हा दुर्वासांनी कुंतीला दिलेल्या वराची माहिती कुंती राजा पांडूला देते. यातूनच पुढे नियोगपद्धतीने अनुक्रमे यमधर्म, वायू, इंद्र यांपासून राणी कुंतीला युधिष्ठिर, भीम, अर्जुन तर अश्विनीकुमारांपासून राणी माद्रीला नकूल व सहदेव या पुत्रांची प्राप्ती होते, ही कथा वैशंपायन ऋषी राजा जनमेजयाला सांगत आहेत.


 संकलन व टीप : अभिजीत काळे, ९८५०६९०५९७.


*🌺🌸🌺शुभसकाळ🌺🌸🌺*

निऋति

 यातील निऋति या शब्दाचा अर्थ मात्र महत्प्रयासाने सापडला आधी मला वाटलेलं की निऋति हे नामविशेषण नैऋत्य दिशेच्या देवतेशी अथवा रहिवाश्याशी संबंधीत असावे. 

     नंतर नेहमीप्रमाणे ज्याचा हात धरून आपण रोज चालतो त्या गूगलला हाक मारली व अपेक्षेप्रमाणे तो मदतीला आला. तिथे निऋति चे अर्थ खालीलप्रमाणे मिळाले

स्त्री. १ नैऋत्य दिशा ; दक्षिण आणि पश्चिम या दिशांमधील उपदिशा . २ ( ल . ) नाश ; मृत्यु ; विपत्ति . - पु . नैऋत्य दिशेची देवता . [ सं . ]


प्राचीन चरित्रकोश | hi  hi | Person or Entity  | 

निऋति II. n.  एकादश रुद्रों में से एक [पद्म. सृ.४०] । यह ब्रह्माजी का पौत्र एवं स्थाणु का पुत्र था [म.आ.६०.२] । यह नैऋत, भोत, राक्षस तथा दिक्पाल लोगों का अधिपति था । शत्रुनाश करने की इच्छा करनेवाले राजा इसकी उपासना करते थे [भा.२.३.९] । यह अर्जुन के जन्मोत्सव में उपस्थित था [म.आ.११४.५७] ।

निऋति III. n.  वरुणपुत्र अधर्म को इसे भय, महाभय तथा मृत्यु नामक तीन पुत्र थे [म.आ.६०.५२-५३] । ये सारे पुत्र ‘नैऋत’ जनपद के रहनेवाले थे एवं भूत, राक्षस-सदृश योनि के समझे जाते थे ।



मात्र निऋति शब्दाविषयी मी आधी दोन वेळा वाचले होते 

त्यापैकी एक उल्लेख श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रात रसातलातील पुण्यनगरातील निऋति नावाच्या राजाचा आहे.

तर मला आठवत असल्याप्रमाणे  दुसरे म्हणजे निऋति ही स्त्री कृषीसंस्कृतीची जनक आहे असेही माझ्यावाचनात आला आहे.



निऋति या शब्दाविषयी आपल्यापैकी कोणाला अजून काही माहिती असल्यास जाणून घ्यायला आवडेल.

महाभारतातील बोधपर श्लोक आदिपुरूष परमेश्वर



_*🌸महाभारतातील बोधपर श्लोक🌸*_


*सौतिरुवाच-*

*आद्यं पुरुषमीशानं पुरुहूतं पुरुष्टुतम्।*

*ऋतमेकाक्षरं ब्रह्म व्यक्ताव्यक्तं सनातनम्॥*

*असच्च सच्चैव च यद्विश्वं सदसतः परम्।*

*परावराणां स्रष्टारं पुराणं परमव्ययम्॥*

          *- १.१.२२-२३ (१.१.२८-२९), महाभारत*


अर्थ :-


       जो आदिपुरूष परमेश्वर सर्वांचे आदिकारण व सर्वांच्या अंतर्यामी असणारा या विश्वाचा नियंता आहे. यज्ञांमधून ज्याला अावाहन केले जाते व ज्याच्यासाठी यज्ञ केला जातो, तसेच अनेक पुरुषांनी अनेक नामांद्वारे ज्याची स्तुती केली आहे. जो ऋत म्हणजेच सत्यस्वरूप आहे. जो एकाक्षर म्हणजेच एकमेव क्षर न होणारा नाश न पावणारा तसेच सर्वव्यापी प्रणवरूप ॐकार आहे. जो साकार व निराकार स्वरूपातले सनातन असे अविनाशी परब्रम्ह आहे.

      असत् व सत् (म्हणजेच माया व ब्रह्म) या दोन्ही रुपाने जो या विश्वात विद्यमान आहे आणि तरीही ज्याचे स्वरूप सत् व असत् यांच्याहूनही भिन्न व विलक्षण असे आहे. जो संपुर्ण परावर म्हणजेच स्थूळ व सूक्ष्म विश्वाचा स्रष्टा (निर्मिक, सृजनकर्ता), पुराणपुरुष व अव्यय म्हणजेच क्षय व वृद्धी सारख्या भौतुक विकारांपासून अलिप्त आहे.

(अशा संपूर्ण चराचराच्या मालकाला मी वंदन करतो.)


टीप-

      महर्षी वेदव्यासांना वंदन करून उग्रश्रवा सौती ऋषी नैमिषारण्यात ह्या श्लोकापासून महाभारत कथेची सुरूवात करतात,

_नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम्।_

_देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्॥१.१.१॥_

        लोमहर्षण ऋषींचा पुत्र उग्रश्रवा सौती ऋषींनी नैमिषारण्यात शौनकऋषी व त्यांच्या गुरुकुलातील इतर ऋषींना ऋषीश्रेष्ठ व्यासांनी लिहिलेला जय नावाचा इतिहास (महाभारत) सांगितला. महाभारताच्या आदिपर्वातील पहिल्या अध्यायात याचं वर्णन आहे.

      त्याप्रसंगी उग्रश्रवा सौती ऋषी सर्वप्रथम या विश्वाच्या निर्मात्यास, नियंत्यास वरील श्लोकातून प्रार्थना करतात व पुढे सर्व ऋषींच्या आग्रहास्तव महाभारत कथा सांगतात.

         आपण आजपासून रोज एक याप्रमाणे महाभारतातील काही 'बोधपर व नीतीपर श्लोक' ह्या विषयावरील मागे सुरू केलेला पण मध्येच खंड पडलेला उपक्रम पुन्हा पहिल्यापासून सुरू करत आहे. श्लोकार्थ व श्लोकसंदर्भित घटना यांचाही यावेळी यथायोग्य, यथाशक्य उल्लेख होईल.

       संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या आध्यायातच महाभारतकथेची स्तुती केली आहे व माउली सांगतात की जे महाभारतात नाही ते तिन्ही लोकांमध्ये कुठेच नाही.


_म्हणऊनि महाभारतीं जे नाही। ते नोहेचि लोकी तिहीं।_

_येणे कारणे म्हणिपे पाहीं। व्यासोच्छिष्ट जगत्रय॥१.४७॥_


       महाभारता विषयी माउलींचे काय म्हणणे आहे आणि माउलींनी महाभारताला कोणत्या कोणत्या विशेषणांनी गौरवलेलं आहे हे ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील खालील ओव्यांवरून आपल्या लक्षात येते,


_आता अवधारा कथा गहन। जे सकळां कौतुका जन्मस्थान।_

_की अभिनव उद्यान। विवेकतरूचे॥१.२८॥_

_ना तरी सर्व सुखांची आदि। जे प्रमेयमहानिधी।_

_नाना नवरससुधाब्धि। परिपूर्ण हे॥१.२९॥_

_म्हणोनी हा काव्यां रावो। ग्रंथ गुरुवतीचा ठावो।_

_एथुनि रसां आला आवो। रसाळपणाचा॥१.३३॥_

_एथ चातुर्य शहाणे झाले। प्रमेय रुचीस आले।_

_आणि सौभाग्य पोखले। सुखाचे एथ॥१.३५॥_

_आणि पाहता नावेक । रंगी सुरंगतेची आगळीक।_

_गुणां सगुणतेचे बिक। बहुवस एथ॥१.३८॥_

_भानुचेनि तेजें धवळले। जैसे त्रैलोक्य दिसे उजळले।_

_तैसे व्यासमती कवळले । अवघे विश्व॥१.३९॥_

          आणि अशा महाभारतरुपी कमळाचा पराग म्हणजेच सार, तो युद्धप्रसंगी श्रीकृष्ण भगवंत‍ाने अर्जुनाला केलेला बोध म्हणजेच भगवद्गीता होय. असे म‍ाऊली पुढे सांगतात.

_आता भारतीं कमळपरागु। गीताख्यु प्रसंगु।_

_जो संवादिला श्रीरंगु। अर्जुनेसी॥ १.५०॥_

_ना तरी शब्दब्रह्माब्धि। मथिलेया व्यासबुद्धि।_

_निवडिले निरवधि। नवनीत हे॥१.५१॥_


संकलन व टीप : अभिजीत काळे, ९८५०६९०५९७.


*🌸🌺🌸शुभ सकाळ🌸🌺🌸*